नवी दिल्ली - बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहे. सोमवारी ( 22 जानेवारी ) खिलाडी अक्षय कुमारनं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येही 'पॅडमॅन' सिनेमाचं प्रमोशन केलं. या कार्यक्रमात अक्षयनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा हाती घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला. ''महिला 'महिला सशक्तीकरण'ला पुढे घेऊन जात आहेत, तसेच टॅक्समुक्त सेनेटरी पॅडसाठीच्या मोहीमेत सहभागी होत आहे'', असे कॅप्शन त्यानं या फोटोला दिला.
अक्षयचे हे ट्विट त्यांच्या चाहत्यांनी रिट्विट केले. काहींनी स्तुतीसुमनं उधळली तर काहींनी टीकेचा भडीमार केला. तर काहींनी त्याला राजकारणात न येण्याचा सल्लादेखील दिला. एकूणच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा हाती घेतलेल्या अक्षय कुमारला त्याच्या चाहत्यांनी चहुबाजूंनी घेरल्याचं पाहायला मिळाले. अक्षयचा पॅडमॅन सिनेमा 9 फेब्रुवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. खरंतर हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमादेखील याच दिवशी रिलीज होणार असल्यानं अक्षय आपल्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली.
'पॅडमॅन' सिनेमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणा-या पॅडसंदर्भात जनजागृती करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे. 'टॉयलेट एक प्रेमकथा'नंतर आता अक्षय कुमार पुन्हा एकदा 'पॅडमॅन' सिनेमाच्या निमित्तानं सामाजिक मुद्दा सर्वांसमोर घेऊन येत आहे. नुकतंच 'पॅडमॅन'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, यामध्ये अक्कीच्या हातात सेनेटरी नॅपकीन दिसत आहे. दरम्यान, अक्षयनं महिलांच्या मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणारे सेनेटरी नॅपकीन टॅक्स फ्री करण्यासाठी मोहीम उभारली आहे. तर दुसरीकडे नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईनंदेखील अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमाला जाहीररित्या समर्थन दर्शवले आहे. मलालानं ‘द ऑक्सफर्ड युनियन’दरम्यान अक्षय कुमारची पत्नी आणि निर्माता ट्विंकल खन्नाची भेट घेतली. ''मी पॅडमॅन सिनेमा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे, या सिनेमातील संदेश अतिशय प्रेरणादायी आहे'', असे मलालानं यावेळी म्हटले होते.