मुंबई: राफेल डीलची कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती काल मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली. यावरुन सोशल मीडियानं सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध घोषणा, भाजपाचे सुरक्षेचे दावे, सरकारच्या विविध योजना या सगळ्याचा संबंध चोरीला गेलेल्या राफेलच्या कागदपत्रांशी लावत सोशल मीडियानं सरकारची जोरदार खिल्ली उडवली.
राफेल डीलमधील महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती काल महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. यानंतर सोशल मीडियावर सरकार ट्रोल झालं. कागदपत्रं कशी सांभाळायची हे शिवसेनेला विचारा, त्यांना ५ वर्ष राजीनामे सांभाळायचा अनुभव आहे, असं ट्विट एकानं केलं. पाकव्याप्त काश्मीरमधील एअर स्ट्राइकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याची भावना व्यक्त केली होती. या विधानाचाही सोशल मीडियानं समाचार घेतला. कागदपत्रं सांभाळता येत नाही आणि म्हणे देश सुरक्षित हातात आहे, असा टोला अनेकांनी सरकारला लगावला.
पंतप्रधान मोदी स्वत:ला चौकीदार म्हणतात. मग कागदपत्रं कशी काय चोरीला कशी जातात? असा सवाल सोशल मीडियानं उपस्थित केला. काहींनी तर याचा संबंध थेट मोदींच्या डिजिटल इंडियाशी जोडला. कागदपत्रांच्या डिजिटल कॉपी तयार केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती, असं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी 'मोदी है तो मुमकिन है' या भाजपाची घोषणेची खिल्ली उडवली.
सरकारला ट्रोल करताना काही जण इतिहासात पोहोचले. कागदपत्रं नेहरुंनीच चोरली असतील, असं आता मोदी म्हणतील, असं ट्विटदेखील काहींनी केलं. या ट्विटसोबत मोदींनी लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या 'मेरा बूथ सबसे मजबूत' घोषणेची खिल्ली उडवण्यात आली. नेहरुंचा हातात ब्रिफकेस घेतलेला फोटो काहींनी पोस्ट केला. त्या ब्रिफकेसमध्येच राफेल डिलची कागदपत्रं असतील असा दावा आता केला जाईल, असं ट्विट करत नेहरुंच्या फोटोसोबत 'मेरा भूत सबसे मजबूत' अशी ओळदेखील काहींनी लिहिली.