पाटणा :बिहारमध्येसोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहारमधील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट करेल किंवा उलट-सुलट बोलेल, त्या युझरवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. या पत्रात सदर माहिती देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, सोशल मीडियामध्ये सरकार, मंत्री, खासदार, आमदार तसेच सरकारी पदाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह, अपमानजनक आणि भ्रामक भाषेचा वापर अनेकदा करण्यात येतो. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा आहे. असा कोणताही प्रकार समोर आल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पोलिसांना सूचना, माहिती देईल. यामुळे दोषींविरोधात प्रभावी कारवाई करता येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अतिरिक्त महासंचालकांचे पत्र समोर येताच आता यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाला बिहार सरकार घाबरत आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला आहे. जाहिरातींमार्फत सरकार आपला अजेंडा राबवत आहे. यामुळे खऱ्या बातम्या दाबल्या जात आहेत. मात्र, सोशल मीडियातून सत्य बाहेर येते. त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई करण्याची भाषा केली जात आहे. नितीश कुमारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्ती यादव यांनी केला आहे.
दुसरीकडे, राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोशय मीडियावर ट्विट करत नितीश कुमार सरकारला आव्हान दिले आहे. ६० घोटाळ्यांचे सृजनकर्ता नितीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पीतामह, अट्टल गुन्हेगारांचे संरक्षणकर्ते आणि अवैध सरकारचे कमकुवत प्रमुख आहेत. बिहार पोलीस दारू विक्रीचे काम करत आहे. गुन्हेगारांना पाठिशी घातले जात असून, निरपराध व्यक्तींना शिक्षा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, या आदेशानुसार मला अटक करावी, असे तेजस्वी यादव यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.