नवी दिल्ली-
ट्विटरवरनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर काही ट्विट्स करत कंपनीच्या कामकाजाबाबतची माहिती देताना कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती केली जाणार नाही. कर्मचारी हवंतर कायमस्वरुपी 'वर्क फ्रॉम होम' करू शकतात अशी घोषणा केली आहे. दरम्यान, ट्विटरची जगभरातील कार्यालयं येत्या १५ मार्चपासून सुरू होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन कामकाज करणं योग्य आणि सोयीस्कर वाटत असेल त्यांनी कार्यालयात यावं, असं पराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणाहून काम करणं अधिक सोयीस्कर आणि उत्तम काम करता येईल असं वाटतं तिथून काम करण्याची प्रत्येकाला मूभा आहे. यात कायमस्वरुपी 'वर्क फ्रॉम होम' सुविधेचाही समावेश आहे, असं पराग अग्रवाल म्हणाले. अर्थात त्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करणं किती फायदेशीर आहे याचीही वकिली केली आहे. कार्यालयात येऊन काम केल्यानं एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण होतं आणि तातडीनं बिझनेस ट्रॅव्हल देखील खुलं करण्यात येईल, असं पराग अग्रवाल म्हणाले.
"कुठून काम करायचं. बिझनेससाठी प्रवास करायचा की नाही किंवा कोणत्या इव्हेंटला उपस्थिती लावायची याचा निर्णय सर्वस्वी कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे", असं ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल म्हणाले.
"जिथं चांगलं वाटेल तिथून काम करा"कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणाहून काम करणं अधिक सोयीस्कर, जास्त प्रोडक्टीव्ह आणि क्रिएटीव्ह वाटेल अशा ठिकाणाहून काम करावं. कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होमचाही पर्याय कर्मचाऱ्यांसाठी सदैव उपलब्ध आहे. तसंच ज्यांना कार्यालयापासून दूर राहून काम करण्याची इच्छा आहे ते नक्कीच काम यापुढेही सुरू ठेवू शकतात, असं पराग अग्रवाल यांनी म्हटलं आहे.