श्रीनगर : काश्मीरच्या खोऱ्यात तीन दशकांनंतर सिनेमागृह सुरू झाले आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील सोनावर भागात पहिल्या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन केले.
मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनानंतर सिन्हा यांनी ट्वीट केले की, गत तीन वर्षांत जम्मू- काश्मीरात एक मोठी सामाजिक- आर्थिक क्रांती होत आहे. उद्घाटन समारंभानंतर मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापनाने लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या शोचे आयोजन केले. नियमित शो ३० सप्टेंबरपासून सुरू होईल. काश्मिरातील या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसनक्षमतेची तीन चित्रपटगृहे आहेत. स्थानिक पाककृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या परिसरात फूड कोर्टही आहे.
दहशतवाद्यांची धास्ती...:
काश्मीर खोऱ्यात १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत डझनभर चित्रपटगृहे होती. मात्र, दोन दहशतवादी संघटनांनी मालकांना धमकाविल्यानंतर त्यांनी व्यवसाय बंद केला. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात काही चित्रपटगृहे सुरू करण्याचे प्रयत्न झाले. सप्टेंबर १९९९ मध्ये लाल चौकाच्या मध्यभागी असलेल्या रिगल सिनेमावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी हे प्रयत्न हाणून पाडले. नीलम आणि ब्रॉडवे ही दोन चित्रपटगृहे सुरू झाली होती. मात्र, कमी प्रतिसादामुळे त्यांनी व्यवसाय बंद केला.