नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर अत्याचाराला होताना दिसून येत आहे. दरम्यान, अज्ञात सायबर गुन्हेगारांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सॉफ्टवेअर आणले आहे. हे सॉफ्टवेअर महिलांचे फोटो हे नग्न फोटोमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते. या संदर्भात एका सायबर रिसर्च एजन्सीने मंगळवारी एक रिपोर्ट जारी केला आहे.
या रिपोर्टनुसार, आतापर्यंत एक लाख महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी सरकारकडे माहिती मागितली आहे. मुंबई हायकोर्टाने बुधवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे महिलांचे फोटो नग्न करणाऱ्या या रिपोर्टबाबत अधिक माहिती मागितली आहे. या रिपोर्टचा हवाला देत कोर्टाने नवीन ऑनलाइन गैरवर्तवणुकीमुळे धोका असून एआय सॉफ्टवेअर महिलांचे फोटो न्यूडमध्ये बदलत आहे, असे सांगत याबाबत सरकारकडे माहिती मागितली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कथित मीडिया ट्रायलशी संबंधित विविध जनहित याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने रिपोर्टमध्ये निर्माण झालेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांना मंत्रालयाला निर्देश देण्यास सांगितले. "प्रिंट मिडियामध्ये काय रिपोर्ट आला आहे, याबाबत तुम्ही मंत्रालयातून माहिती मिळवू शकता. तुम्ही रिपोर्टची चौकशी करावी अशी आमची इच्छा आहे. मंत्रालयाकडून यासंबंधी माहिती घ्या," असे सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटले आहे.
अनिल सिंग म्हणाले, "हा रिपोर्ट वाचला असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A आणि 79 (3) B मध्ये तरतुदी आहेत, त्या अंतर्गत कारवाई करता येईल." तसेच, ही बाब अत्यंत गंभीर आहे असून तुम्ही (मंत्रालय) पावले उचलली पाहिजेत, असे सरन्यायाधीश म्हणाले. दरम्यान, मंत्रालय लवकरच या संदर्भात पावले उचलेल, असे आश्वासन एजन्सींनी खंडपीठाला दिले आहे.