ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २१ - डेव्हलप केलेले सोशल नेटवर्किंग अॅप व्यवस्थित न चालल्याने निराश झालेल्या हैदराबादमधील एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयरने नायट्रोजन पिऊन जीवन संपवले. हैदराबादच्या एसआर नगरमध्ये बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. लकी गुप्ता अग्रवाल असे मृत इंजिनीयरचे नाव असून, तो डीके रोडवरील स्वर्णप्लाझा अपार्टमेंन्टमध्ये रहात होता.
बुधवारी दुपारी लकी नेहमीच्यावेळी न उठल्याने लकीचे वडिल आशिक कुमार अग्रवाल यांना संशय आला. दरवाजावर अनेकदा थाप मारुनही लकी आतून दरवाजा उघडत नव्हता. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा लकी मृतावस्थेत आढळला. त्याने नाकाला लावलेले मास्क नायट्रोजन गॅस सिलिंडरला जोडलेले होते असे एसआर नगरचे पोलिस निरीक्षक एमडी वहीदुद्दीन यांनी सांगितले.
दुपारी तीन वाजता पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना लकीच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात वेदनारहीत मृत्यूला सामोरे जात असल्याचे त्याने लिहीले होते. नायट्रोजनने आत्महत्या हा सोपा आणि वेदनारहीत मार्ग असल्याचेही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहीले होते. लकीने डेव्हलप केलेले अॅप लोकप्रिय न झाल्याने मागच्या तीन महिन्यांपासून तो निराश होता असे कुटुंबियांनी सांगितले.