मुंबई, दि. 1 - गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुजरातचे माजी पोलीस डीआयजी डीजी वंजारा आणि आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांना आरोपातून मुक्त केले आहे. या दोघांवरही सोहराबुद्दीन याला खोट्या चकमकीत मारल्याचा आरोप होता. या आरोपामुळे वंजारा यांना अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी वंजारा यांना 2014 रोजी जामीन मिळाला होता. या दोघांनाही सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोहराबुद्दीन खटल्यातून मुक्तता करण्यात आल्यानंतर वंजारा म्हणाले,"आम्हाला आरोपमुक्त करण्यात यावे यासाठी आम्ही न्यायालयात निवेदन दिले होते. अखेर आज आम्हाला निर्दोष घोषित करण्यात आले आहे. भारतीय न्यायव्यवस्था संथगतीने काम करत असेल. मात्र ती न्याय देते." 2005 साली झालेल्या सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी डी.जी. वंजारा यांना 24 एप्रिल 2007 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2014 साली मुंबईतील एका न्यायालयाने वंजारा यांना सोहराबुद्दीन शेख आणि तुलसी प्रजापती यांच्या कथित एन्काउंटर प्रकरणी जामीन दिला होता. तसेच प्रजापती यांना गुजरातमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. मात्र गेल्या वर्षी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना गुजरातमध्ये जाण्याची आणि वास्तव्य करण्याची परवानगी दिली होती. वंजारा यांनी अनेक संशयितांचे बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. त्यामध्ये सोहराबुद्दीनसोबतच त्याची पत्नी कौसर बी. तुलसीराम प्रजापती, सादीक जमाल, इशरत जहॉ आणि तिच्यासोबत मारल्या गेलेल्या अन्य तीन जणांचा समावेश आहे. आता सोहराबुद्दीन प्रकरणातून त्यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे.
DG Vanzara and Dinesh MN discharged in Sohrabuddin Sheikh encounter case by special CBI court in Mumbai
— ANI (@ANI_news) August 1, 2017