यंदाचे सर्वात मोठे सूर्यग्रहण आज थोड्याच वेळात सुरु होणार आहे. 25 वर्षांनंतर खगोलशास्त्रज्ञांना व नागरिकांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. याकाळात सूर्य अंगठीसारखा दिसणार आहे. याआधी 1995 मध्ये अशाप्रकारचे ग्रहण पहायला मिळाले होते.
आजचे सूर्यग्रहण सकाळी 9.15 मिनिटांनी सुरू होऊन 3.04 मिनिटांनी संपणार आहे. ज्योतिषांनुसार या 5 तास आणि 49 मिनिटांच्या दीर्घ ग्रहणामुळे ग्रहांचे अनेक परिणाम दिसणार आहेत. जगात कोरोना महामारी गेल्या वर्षीच्या सूर्यग्रहणापासून सुरू झाली होती. ती आता या ग्रहणाने संपायला सुरुवात होईल असे काशीच्या ज्योतिषाचार्यांनी सांगितले होते.
आजचे सूर्यग्रहण जरी भारतात दिसणार असले तरीही ते काहीच भागात कंकनाकृती दिसणार आहे. उर्वरित भारतात ते खंडग्रास ग्रहणासारखे दिसेल. तसेच पाकिस्तान, चीन, मध्ये आफ्रिकन देश, उत्तर ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर, युरोपच्या भागात दिसणार आहे. तर भारतात ते राजस्थानच्या सूरतगड आणि अनूपगड, हरियाणाच्या सिरसा, रतिया आणि कुरुश्रेत्र, उत्तराखंडच्या डेहरादून, चंबा, चमोली आणि जोशीमठ या भागामध्ये दिसणार आहे. ही फायर ऑफ रिंग केवळ 1 मिनिटच दिसणार आहे. प्रत्येक शहरात हे सूर्यग्रहण वेगवेगळ्या वेळेनुसार दिसणार आहे. दिल्लीमध्ये हे ग्रहण सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि 01.44 वाजता संपेल.
कसे पाहता येईल?सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे खूप धोक्याचे आहे. यामुळे हे ग्रहण काळी काच, काळा गॉगल यातून पहावे लागणार आहे. एवढीही तयारी नसेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल Slooh वर लाईव्ह पाहता येणार आहे. NASA देखील ग्रहण लाईव्ह प्रक्षेपित करणार आहे.
इथे पाहू शकता....
ग्रहण म्हणजे काय?
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो.
थेट पाहताना काय काळजी घ्याल?
सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास डोळ्यास इजा होते. ग्रहण विशेष चष्म्यातूनच पाहावे. घरबसल्या टीव्हीमध्ये पाहून देखील ग्रहणाचे निरीक्षण करू शकते. सूर्यग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
- सूर्यग्रहण पाहत असताना ते उघड्या डोळ्यांनी पाहू नका.
- ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे तयार करण्यात आले आहेत ते घालूनच ग्रहण पाहावे. जेणेकरून डोळ्यांना इजा होणार नाही.
- फॅब्रिकेशनच्या दुकानातील आर्क वेल्डर वस्तू वेल्डिंग करताना एक विशिष्ट डार्क फिल्टर वापरतात. या फिल्टरचा उपयोग थेट सूर्याकडे पाहण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
- पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.
- होममेड फिल्टर्स म्हणजेच घरातील साध्या चष्म्याचा वापर सूर्यग्रहण पाहण्यासाठी करू नका.
- सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्पेशल सोलार फिल्टरर्सचा वापर करा.
- सोलार फिल्टर वापरण्याच्या आधी तपासून पाहा जर त्यावर स्क्रॅच असेल तर त्यांचा वापर करू नका. फिल्टरवर नमुद करण्यात आलेल्या गोष्टी आधी वाचा.
- पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहू सूर्यग्रहण पाहू नका. ते डोळयांसाठी त्रासदायक ठरू शकते.
- एक्सरे अथवा इतर गोष्टींचा वापर करून सुर्यग्रहण पाहू नका.
- लहान मुलांना ग्रहण दाखवत असाल तर विशेष काळजी घ्या.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Solar Eclipse 2020 : दुर्लभ योग! सूर्याने रंग बदलले; पहा सूर्यग्रहणाची टिपलेली छायाचित्रे
कोरोनाची मजल सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत
Solar Eclipse 2020 : 'कंकणाकृती' सूर्यग्रहण पाहायचंय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी