इयत्ता १० वीपर्यंतच शिक्षण घेता आलं...वयाच्या १९ व्या वर्षी घरच्यांनी लग्न लावून दिला आणि डोक्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलं. तरीही हिंमत न हरता आज सत्यनारायण नुवाल यांनी देशातच नव्हे, तर जगात आपलं नावं केलं आहे. राजस्थानच्या भिलवाडा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सत्यनारायण नुवाल यांना इयत्ता १० वी पर्यंतच शिक्षण पूर्ण करता आलं. पुढे ते शिक्षण घेऊ शकले नाही. वडीलांच्या निवृत्तीनंतर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सत्यनारायण यांना संघर्ष करावा लागला. आज ते ७० वर्षांचे झाले आहेत आणि सध्या त्यांचा बिझनेस कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी लग्नफाऊंटन पेनची शाई विकण्यापासून त्यांनी कमाईला सुरुवात केली. पण यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केलं आणि नवी जबाबदारी येऊन ठेपली. पोट भरण्यासाठी काम करावं लागत होतं आणि यासाठी त्यांना १९७७ साली महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारशाह येथे यावं लागलं. जिथं त्यांची भेट अब्दुल सत्तार अल्लाहभाई यांच्याशी झाली. जे विहीर खोदणं, रस्ते बनवणं आणि खाणीत लागणाऱ्या विस्फोटकांचे व्यापारी होते. हाच सत्यनारायण यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला असं म्हणता येईल.
"त्यावेळी विस्फोटकांची उपलब्धता खूप कमी होती. या व्यवसायात मोजक्या कंपन्या एकाधिकारशाहीनं वागत होत्या. अवघ्या १ हजार रुपयांच्या भांडवलासह अल्लाहभाई यांच्या विस्फोटकांच्या गोदामाच्या माध्यमातून विस्फोटकांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला", असं सत्यनारायण यांनी सांगितलं. काही वर्षांनी ब्रिटनची एक कंपनी इम्पेरियल केमिकल इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांची नजर सत्यनारायण यांच्या कामावर पडली आणि त्यांनी कंपनीचा अधिकृत वितरक होण्याची संधी त्यांना दिली.
कर्ज घेऊन केली सुरुवात१९८४ साली नागपूरात सुरुवात करुन त्यांची वेस्टर्न कोलफील्डसोबत जवळीक वाढली. सुरुवातीच्या काळात या क्षेत्रातील व्यवसाय अगदी ठप्प होता. डीलर २५० रुपयांमध्ये २५ किलो विस्फोटक खरेदी करुन बाजारात ८०० रुपयांना विकायचे. त्यानंतर सरकारनं अधिक पैसे देण्यास सुरुवात केली आणि या व्यवसायातील स्पर्धा वाढली. नुवाल यांना विस्फोटकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. १९९५ साली स्टेट बँकेकडून ६० लाख रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी विस्फोटक बनवण्याचा कारखाना सुरू केला. कोल इंडिया लिमिटेड कंपनीला ते विस्फोटक पुरवू लागले. पुढे १९९६ साली सत्यनारायण यांना ६ हजार टन विस्फोटक तयार करण्याचा परवाना मिळाला आणि खरी प्रगती सुरू झाली.
आज सत्यनारायण यांची कंपनी जगातील एकूण ६० देशांना विस्फोटक पुरवण्याचं काम करते. भारतातील एकूण विस्फोटकांच्या निर्यातीपैकी एकूण ७० टक्के वाटा एकट्या सत्यनारायण यांचा आहे. केंद्रानं 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देत केलेल्या योजनेअंतर्गत संरक्षण मंत्रालयानं घेतलेल्या पुढाकारामुळे सत्यनारायण यांना आणखी एक मोठी संधी मिळाली. त्यांची कंपनी आता ड्रोनसाठी वॉरहेड, हातगोळे, सैन्य विस्फोटक, रॉकेट तसंच अग्नी सारख्या मिसाइलसाठी स्फोटकं बनवण्याचं काम करते.
७५०० हजार लोक करतात कामसत्यनारायण यांच्या सोलर इंडस्ट्रीज कंपनीनं यंदाच्या वर्षात जुलैमध्ये ब्राह्मोस मिसाइल लॉन्च करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॅप-ऑन बुस्टरचा पुरवठा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे. आज सोलार इंडस्ट्रीजमध्ये ७,५०० कर्मचारी काम करत आहेत आणि नागपुरात कंपनीचे दोन कारखाने आहेत.
सत्यनारायण यांचे इतर सात देशांमध्येही कारखाने आहेत. ३१ मार्च रोजी २,९८२ कोटींच्या ऑर्डरसह २०२१-२२ या वर्षात त्यांच्या कंपनीचा महसूल ३,९४८ रुपये इतका होता. तर नफा ४४१ कोटी रुपये आणि कंपनीचं बाजारमूल्य ३७,१५७ कोटी रुपये इतकं आहे. सध्या नुवाल यांची एकूण संपत्ती १४,७०० रुपये इतकी आहे.