- विकास झाडेनवी दिल्ली : जगापुढे ‘क्लायमेट चेंज’चे आव्हान असल्याने प्रत्येक देश शक्यतो ‘ग्रीन एनर्जी’ निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. हरित उर्जेचा सातत्याने पुरस्कार करणारे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही त्याचमुळे जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट (तरंगणारा सौर उर्जा प्रकल्प) उभारण्यासाठी पुढकार घेतला आहे. त्याबाबत केंद्र व राज्यांतील संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक होईल. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी बुधवारी डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संभाव्य तरंगणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पाची माहिती दिली.
डॉ. कराड म्हणाले की, जगभर नैसर्गिक संपत्तीचे ज्वलन सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उर्जेबाबत योग्य नियोजन असले तर बरेच विषय निकाली निघतील. जायकवाडी धरणावर दोन हजार एकर भागावर तरंगणारा सौर उर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो. केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग यांचेशी माझे बोलणे झाले आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दिल्लीत बैठक होईल.
शेतकऱ्यांनाही लाभ
या प्रकल्पाला ८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चार एकर भागांतून १ मेगावॅट वीजनिर्मिती होईल. मुख्य म्हणजे प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जमीन लागणार नाही. यातील वीजनिर्मितीचा लाभ शेतकऱ्यांना व उद्योगांना होईल. सध्या १२ रुपये प्रती युनिट वीज विकत घ्यावी लागते, ती केवळ ३ रुपये प्रती युनिट मिळू शकेल. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना केवळ रात्रीच वीज उपलब्ध होते, या प्रकल्पामुळे ती दिवसाही मिळेल.