बंगळुरू: रशिया-युक्रेन संघर्षातून धडा घेऊन भविष्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लष्कराला केले. आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) येथे ७५व्या भारतीय लष्कर दिनाच्या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी सशस्त्र दलांना त्यांची क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.
आगामी काळात सर्व प्रमुख सशस्त्र दल त्यांच्या सुरक्षा यंत्रणेला चालना देतील, असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढली आहे. पूर्वी जेव्हा भारत बोलत असे तेव्हा ते कोणी गांभीर्याने घेत नसे; पण आता जेव्हा आपण बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, असे ते म्हणाले.
केंद्र व राज्यांतील भाजप सरकारांनी कधीही प्रसारमाध्यमांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातली नाही. कोणाच्याही भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. रा. स्व. संघाशी निगडित पांचजन्य या साप्ताहिकाने रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येक भारतीयाला लष्कराचा अभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराचे कौतुक केले. सैनिकांनी नेहमीच देशाचे रक्षण केले आहे. तसेच संकटकाळातील सेवेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. प्रत्येक भारतीयाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी त्यांच्या ब्रिटिश पूर्ववर्तीकडून भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो.
लष्कर सज्ज: भारतीय लष्कर चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) मजबूत बचावात्मक पवित्रा राखत असून, सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यास सज्ज आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रविवारी येथे सांगितले. पांडे म्हणाले, नियंत्रण रेषेवर युद्धविराम सुरू आहे. परंतु सीमेच्या पलीकडे दहशतवादी संघटनांचे जाळे कायम आहेत. आमचे सैन्य घुसखोरी हाणून पाडत आहे.
सैनिकांनी आपत्तीच्या काळात तारणहार म्हणून काम करण्याबरोबरच रणभूमीवरील आपले शौर्य वाढवत नेले आहे. भारतीय लष्कराच्या सर्व शूर सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना मी सलाम करते. -द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
पाकिस्तानात उगम पावणारा दहशतवाद आणि चीनसोबतच्या चकमकींना दिलेल्या प्रत्युत्तरातून भारताने हे दाखवून दिले आहे की देश कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. देश आपल्या सुरक्षेसाठी सर्व शक्य ती पावले उचलेल. -एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री