नवी दिल्ली : ईशान्य लद्दाखमध्ये भारत-चीनदरम्यान लष्करी स्तरावरील चर्चेस मंगळवारपासून सुरूवात झाली. दोन्ही देशांमध्ये ही चर्चेची सहावी फेरी आहे. महिनाभरापासून दर आठवड्यास लष्करी व राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होत आहे.मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली चर्चा सायंकाळी उशीरापर्यंत चालली. पँगाँग सरोवर व फिंगर पॉर्इंट ४ पासून दोन्ही बाजूच्या सैनिकांना मागे हटवण्यावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही बाजूचे सैनिक गलवान खोऱ्यातील ३ चौक्यांमधून २ किमी मागे हटण्याची शक्यता आहे. चुशुल सीमेवरील चौकीत चर्चा सुरू आहे. लेफ्टनन जनरल हरिंदर सिंह यांनी भारतीय चमूचे नेतृत्व केले. गेल्या दशकभरापासून ते याच भागात तैनात आहे. दक्षिण क्षिनजियांग लष्करी तळाचे प्रमुख मेजर जनरल लुई लिन यांनी चीनकडून चर्चेत सहभाग घेतला. बरोबर महिनाभरापूर्वी दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये ऐतिहासिक झटापट झाली. हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले.तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भर- नियंत्रण रेषेपासून काही अंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे गेल्यास त्यामुळे तणाव कमी होईल. म्हणून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत मागे सरकत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.- गलवान, गोग्रा व हॉटस्प्रिंगमध्ये भारताने सैनिकांची गस्त वाढवली. केवळ सैनिकच नव्हे तर या भागात तैनात संरक्षण साहित्यदेखील मागे नेण्यावर भारताचा भर आहे.
दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 1:53 AM