महेंद्रगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेली अग्निवीर योजना लोकसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यानंतर कचऱ्यात फेकून दिली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मुळात लष्कराला अग्निवीर योजनाच पसंत नव्हती. त्या योजनेने भारतातील जवानांना कामगार केले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता.
राहुल गांधी यांनी सांगितले की, अग्निवीर ही लष्कराची नव्हे तर मोदींची योजना आहे. ती योजना पंतप्रधान कार्यालयाने तयार केली होती. नियमित सेवेत असलेले लष्करी जवान व अधिकारी यांना पेन्शन, हुतात्मा झाल्यास तसा दर्जा, नियमित सेवेचे सर्व फायदे मिळतात; पण अग्निवीर म्हणून लष्करात भरती झालेल्यांना हुतात्मा म्हणून दर्जाही मिळत नाही तसेच पेन्शन किंवा कॅन्टीनच्या सुविधांपासूनही ते वंचित राहतात.
राहुल गांधी यांनी सांगितले की, इंडिया सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. मोदी यांच्या सरकारने राज्यघटना व आरक्षण रद्द करण्याचा कट आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला.