घोड्यावरून जंगी मिरवणूक अन् लोकांची प्रचंड गर्दी; सैनिक गावात पोहचताच झालं भव्य स्वागत
By प्रविण मरगळे | Published: February 7, 2021 09:58 AM2021-02-07T09:58:17+5:302021-02-07T10:01:02+5:30
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठीकरी गावात राहणारे निर्भय सिंह यांनी भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण केली
मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या सैनिकाचं जंगी स्वागत गावकऱ्यांनी केले. लोकांनी सैनिकाच्या स्वागतासाठी आपले तळहात जमिनीवर ठेवले, इतकचं नाही तर सैनिकाच्या गृहप्रवेशावेळी डीजे-ढोलताशा वाजवत नाचत गाजत सैनिकाला घोड्यावर बसवून संपूर्ण गावात जोरदार मिरवणूक काढण्यात आली.
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठीकरी गावात राहणारे निर्भय सिंह यांनी भारतीय लष्करात २१ वर्ष सेवा पूर्ण केली, या सेवेनंतर निवृत्त होऊन ते त्यांच्या मूळगावी परतले, त्यामुळे या सैनिकाच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली, गावकऱ्यांनी त्यांचे तळहात जमिनीवर ठेवत त्यांचं स्वागत केले. लोकांनी केलेले हे अनोखं स्वागत पाहून निवृत्त सैनिकही भारावले.
जवळपास गावातील लोक आणि नातेवाईक यांच्यासह अनेकांनी सैनिकाच्या स्वागतासाठी गर्दी केली होती, गोपी विहार कॉलनीपासून सार्थक नगर या परिसरात दीड किलोमीटर स्वागत यात्रा आणि डिजेसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक निर्भय सिंह घोड्यावर बसले होते, लोक डिजेवर देशभक्तीच्या गाणं वाजवून नाचण्यात दंग झाले होते, एका हातात तिरंगा फडकवण्यात येत होता. सैनिक घराजवळ पोहचल्यानंतर प्रत्येकाने तळहात जमिनीवर टेकवत त्यांना अभिवादन केले.
याबाबत बोलताना हेड कॉस्टेंबल निर्भय सिंह म्हणाले की, याप्रकारे माझं स्वागत करण्यात येईल याची जराही कल्पना नव्हती, लोकांनी हात पसरवत मला घरापर्यत सोडलं, ही माझ्यासाठी सर्वात मोठी सन्मानाची बाब आहे, मी लोकांचा कायम ऋणी आहे. ज्याप्रकारे लोकांनी माझं स्वागत केले ते पाहून खूप आनंद वाटला, मी वयाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे, जर मला संधी मिळाली तर मी समाजसेवा नक्की करेन, मनात कायम देशसेवा राहिल, त्याप्रमाणे समाजसेवा करेन, मला संधी मिळावी आणि समाजसेवा करावी हीच माझी इच्छा असल्याचं निर्भय सिंह म्हणाले.