जैसलमेर: संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी चक्क तप्त वाळूवर पापड भाजले आणि भातही शिजविला. यावरून उष्णतेच्या दाहकतेचा अंदाज येऊ शकतो. परंतु एवढ्या जीवघेण्या गरमीतही जवान सीमेवर सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत आहेत.जवानांच्या सांगण्यानुसार उष्णता एवढी जास्त आहे की एखाद्या भांड्यात पाणी आणि तांदूळ टाकून वाळूवर ठेवले तर जवळपास तीन तासात भात शिजून तयार होतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे तापमानाची मोजमाप करणाऱ्या या जवानांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत त्यांनी येथे कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. १९५६ नंतर प्रथमच देशात कुठल्या ठिकाणी हे विक्रमी तापमान नोंदविण्यात आल्याचे सांगितले जाते. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार शुक्रवारी जैसलमेरमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जवानांचा अनुभव बघता येथील उष्णता सहनशक्तीच्या पलीकडे आहे. बीएसएफचे जवान कॅप, हेडगिअर, विशिष्ट चष्मे परिधान करून पाण्याच्या बाटल्यांसह तैनात असले तरीही त्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. आम्ही गरम वाळूवर चालतो तेव्हा बुटांचे सोल वितळायला लागतात, असे जवानांनी सांगितले. येथे जवान समतळ भागात पायदळ आणि वाळूवर उंटांच्या मदतीने गस्त घालत असतात.
जवानांनी वाळूवर भाजले पापड!
By admin | Published: May 22, 2016 3:01 AM