नवी दिल्ली : उधमपूर अतिरेकी हल्ल्यादरम्यान अटक करण्यात आलेला अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब हा पाकी नागरिक नाहीच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी भारताने नावेदविरुद्धचे ठोस परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. नावेदचे नातेवाईक आणि मित्रांचे फोन क्रमांक, काही छायाचित्रे, त्यांची नावे, पत्ते हे सर्व भारताच्या हाती लागले आहे.नावेद हा पाकी नागरिक आहे, हे सिद्ध करणारा डोजियर (पुराव्यांची कागदपत्रे) भारताने तयार केला आहे. पाकिस्तानात नावेदचे घर आणि त्याच्या नातेवाईकांच्या घराचे गुगल मॅप लोकेशन व काही छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे डोजियर भारत-पाक यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानला सोपवले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच ही चर्चा रद्द झाली. या डोजियरनुसार नावेदने पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादनजीकच्या जंगलात लष्कर ए तोयबाच्या शिबिरात प्रशिक्षण घेतले होते. २०११ पासून तीन प्रशिक्षण शिबिरात नावेदला प्रशिक्षण देणाऱ्या १७ भारतीयांची नावे यात आहेत. सोबतच नावेदसह या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या अन्य १२ पाकी अतिरेक्यांचीही नावे आहेत. पाकिस्तानात नावेदने जोंग मोबाईल सेवेचा जो क्रमांक वापरला होता, तोही भारताकडे आहे. नावेद हा पाकचाच नागरिक आहे, याचे ठोस पुरावे देण्याच्यादृष्टीने या क्रमांकावरील कॉल डिटेल्स शोधण्यासाठी अमेरिकेची मदत मागण्याचा भारताचा विचार आहे.पाकिस्तानच्या नॅशनल डाटाबेस अॅण्ड रजिस्ट्रेशन अॅथॉरिटीने २०१४ मध्ये नावेदला ओळखपत्र जारी केले होते, असा दावाही भारताने या डोजियरमध्ये केला आहे. नावेद हे ओळखपत्र हरविल्याचा दावा करीत आहे. याशिवाय नावेदचे आई-वडील आणि तीन भाऊ-बहिणीचे नाव, त्यांचे मोबाईल क्रमांक, त्याच्या तीन काकांची नावे व पत्ते, २७ चुलत, मावस व मामेबहीण-भावांची नावे व पत्ते तसेच तनवीर, अफ्रिदी, कासीम व शाहद या चौघांचे नाव व पत्ते याचाही यात समावेश आहे.
अतिरेकी नावेदविरुद्ध ठोस पुरावे
By admin | Published: September 03, 2015 1:33 AM