श्रीनगर - प्रत्येकासारखी मलासुद्धा माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा असते. त्यासाठी मी इथे आलो आहे. तुम्ही माझे कुटुंबच आहात अशा शब्दात पतंप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी यंदा जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी यावेळी आपल्या हातांनी जवानांना मिठाई भरवली आणि शुभेच्छा दिल्या.
गुरेझ सेक्टरमध्ये पंतप्रधानांनी जवानांसोबत दोन तास घालवले. गुरेझ सेक्टर पाकिस्तान व्याप्त काश्मीरपासून हाकेच्या अंतरावर आहे. मागच्या 27 वर्षापासून या भागामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमकी सुरु आहेत. जवानांसोबत वेळ घालवल्यानंतर आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते असे पंतप्रधानांनी सांगितले. जवानांच्या त्याग, समर्पण, तपश्चर्येचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जवान नियमित योगा करतात अशी मला माहिती देण्यात आली आहे. योगामुळे निश्चितच जवानांच्या क्षमतेमध्ये वाढ होईल तसेच त्यांना मानसिक शांतताही लाभेल.
सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर हे जवान पुढे उत्तम योग प्रशिक्षकही बनू शकतात असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी वन रँक, वन पेन्शच्या अंमलबजावणीचा विषयही उपस्थित केला. शक्य त्या प्रत्येक मार्गाने सैन्य दलांच्या कल्याणासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी सलग चौथ्यांदा सीमेवरच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि अन्य लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रियजनांपासून दूर राहून तुम्ही मातृभूमीचे रक्षण करता. यातून बलिदानाची सर्वोच्च परंपरा दिसून येते. देशांच्या सीमांवर तैनात असलेले सर्व जवान शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहेत असा संदेश मोदींनी व्हिजिटर बुकमध्ये लिहीला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी २०१४ मध्ये सियाचिनमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. २०१५च्या दिवाळीत ते डोगराई वॉर मेमोरियल येथे गेले होते. तर गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथील चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. यंदा ते उत्तर काश्मीरमधील गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली.