Sologamy Marriage: देशभरातून प्रचंड विरोध झाला, पण गुजरातच्या 'त्या' मुलीने अखेर स्वतःशी लग्न केलेच...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:34 AM2022-06-09T10:34:00+5:302022-06-09T10:35:48+5:30
Sologamy Marriage: स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. 11 जून रोजी तिचे लग्न होणार होते, पण लग्नात कोणी व्यत्यय आणू नये, यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले.
वडोदरा: स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. क्षमाने 11 जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले.
सर्व रितीरिवाजांनुसार लग्न
क्षमा बिंदूने स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि एका खास विवाह सोहळ्यात स्वतःशी लग्नगाठ बांधली. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी सेरेमनीदेखील झाली. वडोदराच्या गोत्री येथील घरात क्षमाने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. मात्र, या लग्नात मुलगा किंवा लग्न लावणारा पंडित नव्हते. कुठलाही गाजावाजा न करता क्षमाने कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि काही खास मित्रांच्या उपस्थिती लग्न केले.
वाद होऊ नये म्हणून बदलली तारीख
भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. क्षमाने यापूर्वी 11 जून रोजी तिच्या लग्नाची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी सतत लोकांची वर्दळ होती. याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यातच कोणीतरी 11 जून रोजी तिच्या घरी येऊन वाद निर्माण करेल, यासाठी तिने तीन दिवस आधी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मंदिरात लग्न करण्याला विरोध
क्षमाने आधी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप नेत्याच्या विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही अशाप्रकारच्या लग्नाला विरोध दर्शवला होता. लग्न लावणाऱ्या पंडितानेही अशा एकल लग्न किंवा स्व-विवाहाचा विधी करण्यास नकार दिला. यानंतर क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
असा निर्णय का घेतला?
स्वतःशी लग्न करण्याबाबत क्षमाने सांगितले की, तिला लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती, पण वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत नोकरी करते. ‘स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे, म्हणून मी स्वतःशीच लग्न केलंय,’असे क्षमा म्हणाली.
हनिमूनसाठी गोव्याला!
क्षमाचे आई-वडील खुल्या विचारांचे आहेत, या निर्णयास त्यांचाही पाठिंबा आहे. त्यांनी लग्नात क्षमाला आशीर्वादही दिला. आता लग्नानंतर ती हनिमूनला गोव्याला जाणार आहे. देशात ‘सोलो लग्न’ करणारी ती पहिलीच मुलगी असावी, असेही तिने सांगितले.