नवी दिल्ली, दि. 21 - डोकलाम मुद्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. 'भारताला कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा नसून, शांतता हवी असल्याने डोकलाम मुद्द्यावर लवकरच तोडगा निघालेला पहायला मिळेल', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'डोकलाम मुद्द्यार लवकरच तोडगा काढला जाईल. मी आपल्या शेजा-यांना सांगू इच्छितो की, भारताला शांतता हवी आहे, कोणताही संघर्ष नाही', असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 'चीनदेखील सकारात्मक पाऊल उचलत तोडगा काढण्यासाठी मदत करेल', असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'आपण आपल्या आयुष्यातील मित्र बदलू शकतो, पण शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या शेजा-यांसोबत चांगले संबंध असणं खूप महत्वाचं आहे'. राजनाथ सिंह यांनी शांतता राहावी यावर जोर दिला असला तरी आपले सैनिक भ्याड नसल्याचं सांगताना कौतुक केलं आहे. राजनाथ सिंग यांनी यावेळी आपल्या लदाख दौ-याची माहिती दिली. इतक्या कडक थंडीतही जवान कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते असं राजनात सिंह यांनी सांगितंल.
'मी एकदा लदाखला गेलो होते. आयुष्यात कधीही अनुभवली नव्हती इतकी भयानक थंडी वाजत होती. आयटीबीपीचे जवान मला उद्या सकाळी भेटणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. इतक्या भयानक थंडीत जवान दमलेले आणि गारठलेले असतील असं मला वाटलं होतं. पण त्यांना पाहून मी अवाक झालो. त्या थंडीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांच्यातील ती आग पाहून एक मात्र मी नक्की सांगू शकतो की कोणीही भारताकडे डोळे वटारुन पाहण्याची हिंमत करणार नाही', असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
'आपले जवान अत्यंत शूरवीर असून जेव्हा कधी मी जवानांना पाहतो तेव्हा भारताचा पराभव करणं अशक्य असल्याची जाणीव होते. जगामधील कोणतीही शक्ती भारताचा पराभव करु शकत नाही', असं राजनाथ सिंह बोलले आहेत.