नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेद्वारेच तोडगा काढण्याचा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीसांगितले.दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये भीषण हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तसेच संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी आयोजिलेल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत मोदी बोलत होते.या बैठकीच्या कामकाजाची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. नव्या कृषी कायद्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार अत्यंत खुल्या मनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. आमची याआधीही हीच भूमिका होती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हा हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. त्या घटनेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. संसदेतील अडथळ्यांमुळे छोट्या पक्षांची अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेमध्ये कामकाजात अडथळे आल्याने छोट्या पक्षांची विलक्षण अडचण होते. या पक्षांना त्यांचे विषय संसदेत मांडण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या पक्षांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालेल, यासाठी सहकार्य केले पाहिजे.
नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चेद्वारेच काढणार तोडगा, पंतप्रधान मोदी; खुल्या मनाने संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 4:41 AM