लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काही पक्षांची निवडणूक चिन्हे गोठविण्याचे किंवा ती दुसऱ्यांना देण्याच्या घटना काही दिवसांत घडल्या आहेत. मात्र,अपक्ष तसेच मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाने चक्क १९३ निवडणूक चिन्हे राखून ठेवली आहेत. त्यामध्ये काठी, बेबी वॉकर, एअर कंडिशनर, फुगा, बांगडी आदी चिन्हांचा समावेश आहे.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पक्ष त्यांना मिळालेल्या निवडणूक चिन्हांवर निवडणुका लढवतात. मात्र, अपक्ष, मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या चिन्हांच्या यादीतूनच चिन्ह निवडावे लागते. याआधी कोणालाही न दिलेल्या मुक्त चिन्हांची यादी निवडणूक आयोगाने १५ मे रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शिटी, सुई, लोकर, खिडकी, पाकीट, व्हॉक्युम क्लिनर, ट्रम्पेट आदी चिन्हांचाही समावेश आहे.
मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यात यंदाच्या वर्षी डिसेंबर ते जानेवारी २०२४ या कालावधीत विविध तारखांना विधानसभा निवडणुका होणार आहेत. मिझोराम विधानसभेची मुदत १७ डिसेंबरला, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभेची मुदत अनुक्रमे ३ व ६ जानेवारीला संपणार आहे. राजस्थान, तेलंगणा विधानसभेची मुदत अनुक्रमे १४ जानेवारी व १६ जानेवारीला संपत आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी मुक्त निवडणूक चिन्हांचाही बोलबाला दिसणार आहे.