नवी दिल्ली : कोविड-१९ लस घेण्यासाठी अनेक भारतीय ब्रिटनला जाण्यास इच्छुक असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी ट्रॅव्हल एजंटांकडे मोठ्या प्रमाणात विचारणा करणारे फोन येत आहेत. या लसीला ब्रिटिश सरकारने बुधवारीच मान्यता दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून सार्वजनिक लसीकरण अभियान राबविले जाण्याची शक्यता आहे. या अभियानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी तीन दिवसांचे पॅकेज सुरू करण्याची योजना एक ट्रॅव्हल एजंट आखत असल्याची माहिती आहे.
कोविड-१९ विरोधातील फायझर/बायोएनटेक लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. ब्रिटनच्या औषधी व आरोग्य उत्पादने नियामकीय संस्थेने (एमएचआरए) कठोर विश्लेषण केल्यानंतर बुधवारी लसीला मान्यता देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. मुंबई येथील एका ट्रॅव्हल एजंटने सांगितले की, अनेक लोकांनी आम्हाला बुधवारीच फोन करून कोविड-१९ लस घेण्यासाठी आम्हाला कसे आणि कधी ब्रिटनमध्ये जाता येईल, याची विचारणा केली. मी त्यांना सांगितले की, भारतीयांना ब्रिटनमध्ये लस मिळेल का हे आताच सांगणे कठीण आहे. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
काळ सुसंगत नाहीईझी माय ट्रीप डॉट कॉमचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी सांगितले की, लंडनला प्रवास करण्यासाठी हा काळ सुसंगत नाही. तरीही लसीच्या मान्यतेची घोषणा झाल्यानंतर प्रवासाबाबत विचारणा करणारे फोन आले आहेत. ज्यांना ब्रिटनचा व्हिसा मिळाला आहे तसेच जाणे परवडू शकते, अशा लोकांचा यात समावेश आहे. ब्रिटिश सरकार लसीकरण बंधनकारक करणार आहे का भारतीय लसीकरणासाठी पात्र असतील, याबाबतचा खुलासा होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे.