क'र्नाटक'मध्ये आता खातेवाटपावरून काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 09:50 PM2018-05-26T21:50:28+5:302018-05-26T22:19:51+5:30
कर्नाटकातील राजकीय नाट्यमय घडामोडींना अद्यापपर्यंत ब्रेक लागलेला नाही.
बंगळुरू - कर्नाटकातील राजकीय नाट्यमय घडामोडींना अद्यापपर्यंत ब्रेक लागलेला नाही. आता काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खातेवाटपावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. खातेवाटपाबाबत काँग्रेससोबत मतभेद असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जाहीरपणे सांगितले. मात्र, याचवेळी सरकारला कोणताही धोका नसल्याचंही त्यानं स्पष्ट केले. एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले की, 'काही खात्यांबाबतीत काँग्रेससोबत आमचे मतभेद आहेत. मात्र याचा सरकारला कोणताही धोका नाही. हा मुद्दा आम्ही प्रतिष्ठेचा बनवणार नाही. संबंधित विषय फार न ताणता त्यावर तोडगा काढला जाईल.
राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी चार्टर्ड विमानाने शनिवारी दिल्लीमध्ये दाखल झालेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यासहीत काँग्रेसचे अन्य नेतेमंडळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांची बैठक झाल्याचे माहिती समोर आली आहे.