‘काँग्रेसमधील काही नेत्यांना राम आणि हिंदूंबाबत अडचण’, ज्येष्ठ नेत्याकडून घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:53 PM2023-11-16T17:53:35+5:302023-11-16T17:54:25+5:30
Congress: देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही काळापासून काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.
देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही काळापासून काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये काही असे लोक आले आहेत ज्यांना काही अडचणी आहेत. त्यांना रामाची अडचण आहे. त्यांना वंदे मातरममुळे अडचण होते. भारत माता की जय म्हटल्यावर त्रास होतो. त्यांना हिंदू आणि हिंदू धर्मगुरूंचीही अडचण होते. काँग्रेस तो पक्ष आहे जो महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावरून चालतो. गांधीजींच्या प्रत्येक सभेची सुरुवात ही रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या भजनाने होत असे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये प्रमोद कृष्णम म्हणाले की, काँग्रेसमध्ये असण्याचा अर्थ सनातनबाबत बोलू नये. मर्यादा पुरुषोत्तमाबाबत बोलू नये. त्यांना अपशब्द उच्चारणाऱ्यांना विरोध करू नये, असा होत नाही. काँग्रेसमध्ये राहण्याचा अर्थ हिंदू धर्माबाबत बोलू नये, असा होत नाही. उदयनिधी मारन यांनी केलेलं विधान हे हिंदू धर्माविरोधात होतं. त्याचा विरोध केला पाहिजे, असेही प्रमोद कृष्णम यांनी सांगितले.
तसेच विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या इंडिया आघाडीबाबतही प्रमोद कृष्णम यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे प्राण निघून गेले आहेत. तसेच त्याच्यावरील अंत्यसंस्कार अखिलेश यादव यांनी केले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.