'आणखी काही पक्षही सोडतील, कारण 'दलदलीत'...; ममता यांच्या 'ना' नंतर काँग्रेस नेत्याची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:40 PM2024-01-24T15:40:50+5:302024-01-24T15:41:45+5:30
काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 'एकला चलोरे'ची भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत जागावाटपावर एकमत न झाल्याने तृणमूल काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे.
आचार्य प्रमोद हे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. ते म्हणाले, 'आता काही आणखी पक्षही सोडतील, 'दल-दल'मध्ये कुणीही फसू इच्छित नाही.'
नुकतेच, त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले होते, 'हा सनातनचे शासन आणि 'राम राज्या'च्या पुनर्स्थापनेचा दिवस आहे. शेकडो वर्षांचा संघर्ष आणि हजारो लोकांच्या बलिदानानंतर हा क्षण आला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर हे शक्य झाले नसते, असे मला वाटते.'
आप सर्व १३ जागा जिंकेल - मान
ममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. आप पंजाबच्या सर्व १३ जागांवर निवडणूक जिंकेल असे वक्तव्य मान यांनी केले आहे. मात्र, याचबरोबर आपण ममता बॅनर्जी यांच्या मार्गावर जाणार नाही असेही मान यांनी म्हटले आहे.