नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित‘टूलकिट’ प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीविरुद्ध दाखल एफआयआरसंबंधी काही माध्यमांतील वृत्त निश्चितच खळबळजनक आणि पूर्वग्रहित आहे, असे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने माध्यम प्रतिष्ठानांना चौकशीशी संबंधित फोडलेली सामग्री प्रसारित न करण्याचा आदेश दिला.दिशा रवीने माझ्याविरुद्ध दाखल एफआयआरशी संबंधित माहिती प्रसार माध्यमांना फोडण्यापासून पोलिसांना मनाई करण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे. व्हॅाटस्ॲपसह मी इतराशी केलेल्या अन्य खाजगी गप्पागोष्टींचा सारांश प्रकाशित करण्यापासून माध्यमांना मनाई करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना न्या. प्रतिभा एम. सिंह यांनी पोलिसांना निर्देश दिले की, चौकशी संबंधित कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. तसेच असे करण्याचा इरादा नाही, अशी भूमिका पोलिसांनी प्रतिज्ञापत्र मांडली. त्याचे पोलिसांनी पालन करावे. टूलकिट प्रकरणात अशा प्रकरणात माध्यमांना माहिती देण्यासाठी कायद्यानुसार पोलिसांना २०१० रोजीच्या निवदेनाचे पालन करून पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे. माध्यम प्रतिष्ठानांनी फक्त खात्रीशीर माहितीच प्रकाशित करावी. तसेच दिशा रवीविरुद्ध एफआयआरप्रकरणी चाललेली चौकशी बाधित करू नये. खातरजमा करून आणि अधिकृत स्रोतांकडून प्राप्त वृत्त माध्यमांनी प्रकाशित वा प्रसारित करावे, असे निर्देश हायकोर्टाने दिले. याप्रकरणाशी संबंधित वृत्त सामग्री किंवा दिल्ली पोलिसांची ट्वीट हटविण्यासंबंधीच्या याचिकेवर नंतर विचार केला जाईल. खाजगीपणासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य यात समतोल असावा, असेही हायकोर्टाने सांगितले.
दिशाला ३ दिवस न्यायालीय कोठडीदरम्यान, पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्लीच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिशाला कोर्टात हजर केल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तुरुंगात रवानगी केली. सह-आरोपी शंतनू मुकूल आणि निकिता जेकब चौकशीत सामील झाल्यानंतर पोलिसांना दिशाची अधिक चौकशी करण्याची गरज लागू शकते. मुकूल आणि जेकब यांना २२ फेब्रुवारी रोजी पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलिसांनी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलाने पोलिसांच्या याचिकेला विरोध करत कोर्टाला दिशाची सुटका करण्याची विनंती केली.