कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्या लोकांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अशा लोकांवर मोदी यांनी जोरदार टीका केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपल्या जवानांच्या धाडसाचे देशवासियांना अभिमान वाटत आहे, तर दुसरीकडे अशी माणसे एअर स्टाइकवर शंका घेऊन पाकिस्तानाला तसेच दहशतवाद्यांना फायदा होईल अशी वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याने सध्या पाकिस्तान दबावाखाली आहे. त्यावेळी या माणसांच्या वक्तव्यावरून जगभरातील देशाची वाईट प्रतिमा निर्माण होत आहे. देशाची सव्वाशे करोड जनता एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला जावा अशी इच्छा ठेवते. याच इच्छेच्या जोरावर मी दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काश्मिरींना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
कानपूर येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथील काश्मिरींना मारहाण घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. सध्या देशाचा ऐक्य राखणं महत्त्वाचे आहे. मात्र काही माथेफिरू लोक काश्मिरींना मारहाण करत आहेत. ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या प्रत्येक ठिकाणी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिल्या.