NHRC Foundation Day: मानवी हक्कांकडे (Human Rights) केवळ राजकीय फायदा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे देशाच्या मानवी अधिकारांचं आणि लोकशाहीचं मोठं नुकसान होत आहे. काही लोक मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम करत आहेत, असा संताप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (NHRC) २८ व्या स्थापना दिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. "मानवी हक्कांचा विषय येतो त्यावेळी काही लोक ठरावीक घटना आणि घटकांच्या हक्कांच्या उल्लंघनावर मोठी चर्चा करतात. पण त्याच पद्धतीच्या घटना इतर ठिकाणी होतात. त्यावर हेच लोक गप्प राहणं पसंत करतात. त्यामुळे केवळ ठराविक घटनांवर आवाज उठवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अशा लोकांकडून केला जात आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"जेव्हा मानवी हक्कांकडे केवळ राजकीय अंगानं पाहिलं जातं. त्याचं मोजमाप राजकीय फायदा आणि तोटा या उद्देशातून केलं जातं. अशा पद्धतीचं वर्तन हे देशाच्या लोकशाहीला नुकसानदायक ठरतं. मानवी हक्कांशी निगडीत एक वेगळीच बाजू सध्या प्रकर्षानं दिसून येत आहे. त्याबद्दल मला बोलायचं आहे. गेल्या काही वर्षात काही लोकांनी मानवी हक्कांची परिभाषा त्यांना हव्या त्या पद्धतीनं आणि त्यांचा फायदा पाहून सांगण्यास सुरुवात केली आहे", असंही मोदी म्हणाले.