नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आता भारतातही वेगाने पसरू लागला आहे. याला रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. मत्र तरीही, कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 9 हजारवर जाऊन पोहोचला. याच पार्श्वभूमीवर, सरकारने पूर्वी घोषित केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी आपण हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत असल्याचे मोदींनी जाहीर केले. त्यामुळे लोकांना आता आणखी 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहे.
देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन आत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना व्हायरसचा सामना अत्यंत ताकदीने लढत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देशातील विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर भाष्य करताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी टीका केले आले. यात त्यांनी आर्थिक पॅकेजचा मुद्दा उचलला आहे. 'पंतप्रधानांचे भाषण प्रेरणादायी होते. पण कुठल्याही प्रकारच्या आर्थिक पॅकेजची घोषणा न करणे, कुठल्याही प्रकारची ठोस माहिती न देणे, यात गरीब, मध्यमवर्गीय आणि व्यापाऱ्यांसाठी कुटल्याही सहायता निधीची घोषणा करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन चांगलेच आहे, पण जनतेच्या उपजिविकेचे काय? असा प्रश्न सिंघवी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयासंदर्भात ट्विट करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे, की पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेले लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भारतीयांचे स्वास्थ चांगले राहावे या दृष्टीने घेण्यात आला आहे.
माजी क्रिकेटर तथा भाजप खासदार गौतम गंभीर यांनीही पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गंभीर यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आपण भारतीय नागरिकांनीच हे 21 दिवस केले आणि आम्ही हे आणखी काही आठवडे करू. कृपया लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करा.
पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे, की लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय त्यांची दूरदृष्टी दाखवतो. हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला निर्णय आहे. हा, कोरोनाचा प्रसार थांबवण्याबरोबरच देश सुरक्षित ठेवण्यासाठी सहाय्यक ठरेल आणि नवीन भागांमध्ये व्हायरस जाण्यापासून रोखेल.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात ट्विट करत, आम्ही नेहमी पंतप्रधान मोदीजींच्या सल्ल्याचे अनुसरण केले आहे. चला तर, वृद्धांची काळजी घेऊन, सामाजिक अंतर राखून, फेस मास्क वापरून, आपली प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टाने प्रयत्न करून, आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून त्यांच्या सल्ल्याचे पालन करू या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा सल्ला सर्वांना सांगूया!
पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजप नेते संबित पात्रा यांनी, COVID-19च्या विरोधातील लढाईत भारताची प्रतिक्रिया समग्र, एकीकृत आणि निर्णायक ठरली आहे, असे ट्विट केले.