वाराणसी - देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे. काही ठिकाणी कांद्यावरून राजकारण सुरू झाले आहे. वाराणसीमध्ये कर्ज स्वरूपात कांदे देण्यात येत आहेत. मात्र यासाठी आधार कार्ड गहाण ठेवावं लागणार आहे. म्हणजेच आधार कार्ड गहाण ठेवून त्याबदल्यात कांदा कर्ज म्हणून दिला जात आहे. कांद्याच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा म्हणून अशा पद्धतीची सुविधा देण्यात आल्याची माहिती दुकानदाराने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाराणसीत आधार कार्ड गहाण ठेवून त्याबदल्यात कांदा कर्ज म्हणून दिला जात आहे. समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्याचे हे दुकान आहे. दुकानदाराने कांद्याच्या दरवाढीविरोधात आंदोलन म्हणून कांदा कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. आधार कार्ड आणि चांदीचे दागिने गहाण ठेवून लोकांना त्याबदल्यात कांदा कर्ज म्हणून दिला जात असल्याची माहिती दुकानदाराने दिली.
बिहार आणि पाटणामध्ये 35 रुपये प्रती किलो कांदा विकला जात असल्याने तेथील लोकांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहार आणि पाटणामध्ये कांदे 35 रुपये प्रती किलो या भावाने विकले जात आहेत. बिहारमधील सहकारी संघटना (Biscomaun) ने कांद्याच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा म्हणून स्वस्त दरात कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. स्वस्त दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांनीही लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बिस्कोमानने शहरात ठिकठिकाणी कांद्याची विक्री करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहेत. एका व्यक्तीला 35 रुपये किलो या दराने फक्त दोन किलो कांदे दिले जात आहेत. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमटीसी ही केंद्र सरकारची व्यापारी संस्था कांदा आयात करेल तर नाफेडच्या माध्यमातून भारतातील बाजारपेठांमध्ये त्याचे वितरण होईल अशी घोषणा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र अद्यापही अनेक भागात कांद्याच्या दराने शंभरी गाठलेली आहे. तर काही ठिकाणी कांद्यावरून राजकारण सुरू झाले आहे.
उत्पादन घटल्यामुळे गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीच कांदा शंभर रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला असून देशाच्या अन्य भागांमध्ये 80 रुपये प्रती किलोपर्यंत भाव वाढलेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला 6017 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उपबाजारात 78 वाहनांमधून 1600 क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत अनपेक्षित तेजी आली. सध्या गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.