नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत जी२० संमलेनाची जोरदार तयारी सुरू असून सर्वच पातळीवर शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून देशात जी२० च्या परिषदांचं आयोजन केलं जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं महत्त्व वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, देशातो होत असलेल्या संमेलनाकडे जगाचे लक्ष लागले आहे. अनेक विदेशी पाहुणे या संमेलनासाठी भारतात येत असून काहीजण पोहोचलेही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांचे प्रमुख जी२० परिषदेसाठी दिल्लीत येत आहेत. त्यामुळे, राजधानी दिल्लीत मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात असून पोलिसांसह भारतीय सैन्याच्या जवानांचाही फौजफाटा उतरला आहे. NSG, SPG, सैन्यदल, वायुसेनेसह देशातील इतरही अर्धसैनिक बल सुरक्षा व्यवस्थेत योगदान देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून सुरक्षेची खरबदारी म्हणून सर्वत्र गस्त घालण्यात येत आहे.
वाहनांतून रस्त्यावर, तर ड्रोनच्या माध्यमातून हवाई सुरक्षेवर नजर ठेवण्यात येत आहे. यमुना नदीत बोटीतून प्रवास करत दिल्ली पोलिसांची गस्त सुरू आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर किंवा कार्यक्रमस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा आणि खरबदारी घेण्यात येत आहे. ज्याठिकाणी वाहन घेऊन किंवा सहजपणे पोहोचता येत नाही, तिथे शक्य त्या वाहनाने किंवा साधनांचा वापर करुन पोलिस पोहोचत आहेत.
दिल्लीतील राज घाट परिसरात पोलिसांनी ट्रॅक्टरमधून पेट्रोलिंग केल्याचं पाहायला मिळालं. या पेट्रोलिंगचा व्हिडिओही समोर आला आहे. राजघाट परिसरात ट्रॅक्टरवरुन गस्त घालत दिल्ली पोलिसांनी पाहणी केली. तर, युमना नदीत बोटीतून प्रवास करत सुरक्षेचा आढावा घेतला.
दरम्यान, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही दिल्लीत होत असलेल्या जी२० परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. सुरक्षा, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर देत संलमेनानिमित्त स्वच्छ दिल्ली, सुंदर दिल्ली करण्याचं काम सुरू झालं आहे. ८ ते १० सप्टेंबर दरम्यान दिल्लीत जी२० परिषदेचा संमेलन सोहळा पार पडत आहे.