अहमदाबाद - गुजरातमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अटकळ बांधली जात आहे. अशा स्थितीत पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना, गुजरातमध्ये उत्तरायण सणापूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. २० डिसेंबर रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत बैठक झाली.
सूत्रांनुसार या बैठकीत गुजरातवर चर्चा झाली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान मोदींना पुढील महिन्यात होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ च्या तयारीची माहिती दिली. त्याचसोबत राज्यातील इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली. पीएम मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ भेटीमुळे गुजरातमध्ये काही मोठे घडणार आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सरकार आणि संघटना आघाडीवर मोठे फेरबदल होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यातील ही भेट सुमारे साडेतीन तास चालली.
या बैठकीत २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सरकारचा कारभार आणि संघटनेतील रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा झाली. गुजरात भाजपच्या कोअर टीममध्ये सहा मोठी पदे रिक्त आहेत. त्यापैकी दोन पदे राज्य महामंत्र्यांची आहेत. भार्गव भट्ट आणि प्रदीप सिंह वाघेला यांच्या राजीनाम्यानंतर ही पदे रिक्त आहेत. प्रदेश सरचिटणीस असण्यासोबतच प्रदीप सिंह वाघेला गांधीनगर येथील कमलमचे प्रभारीही होते. अशा परिस्थितीत २०२४ च्या निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असताना संघटन मजबूत करून पक्षाला पुढे जायचे आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?गुजरातच्या भूपेंद्र सरकारने गेल्या आठवड्यात दुसऱ्या टर्मचे पहिले वर्ष पूर्ण केले. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकल्या होत्या. भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर गुजरात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता राज्यात २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की नाही हे पाहायचे आहे. राज्यातील अनेक महामंडळांची अध्यक्षपदेही रिक्त आहेत. यावरही नियुक्त्या होणे बाकी आहे.