नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्नाटकात सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, दारूची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या. तर, राजधानी दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर कवी आणि आम आदमी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी ट्विट करुन शायरीतून नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदी साठी येईल. दरम्यान, काही ठिकाणी दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती दिसत आहे. दारुच्या दुकानाबाहेर लोकांची रांग लागली असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तर, पोलीस यंत्रणांवरही ताण पडल आहे. या रांगा पाहून डॉ. कुमार विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कुमार यांनी मैराज फैदाबादी यांची शायरी ट्विट करत दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगांबद्दल मत व्यक्त केलंय.
मैकदे में किसने कितनी पी ख़ुदा जाने मगर,मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया..!”
अशी आशयपूर्ण शायरी ट्विट करुन कुमार विश्वास यांनी दारुमुळे गोरगरीब आणि गरिब वस्तीतील कुटुंबीयांची व्यथा आपल्या शब्दातून मांडली आहे. दारुसाठी लागलेली रांग हे नक्कीच निराशावादी चित्र असल्याचे विश्वास यांनी आपल्या ट्विटमधून सूचवलंय.
दरम्यान, अनेक दारूच्या दुकानांबाहेर पोलीस सुद्धा तैनात आहेत. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये, यासाठी दारूच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टंसिंगचे पालन लोकांकडून होत आहे की, नाही यावर पोलीस नजर ठेवून आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.