'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 09:39 PM2019-11-15T21:39:53+5:302019-11-15T21:40:41+5:30
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.
इंदौर : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करता न आल्याने भाजपाला विरोधात बसावे लागणार आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते असे सूचक वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात विचारसरणी न जुऴणाऱ्या पक्षांची आघाडी असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. यावर त्यांनी महाराष्ट्रात वैचारिकदृष्ट्या न जुळणाऱ्या पक्षांची युती होत आहे. हे सरकार कसे टिकेल? राज्यात विकास कामे होतील का? हे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. सध्या आम्हाला या प्रश्नांवर प्रतिक्रिया द्यायची नाहीय. त्यांची आघाडी अस्थिर करण्यापेक्षा आम्ही त्यांना आशीर्वादच देऊ, असा टोलाही विजयवर्गीय यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात विचारसरणी न जुऴणाऱ्या पक्षांची आघाडी केल्याच्या टीकेवरून पीडीपी सोबतच्या सरकारबाबत छेडले असता त्यांनी भाजपानेही वैचारिकदृष्ट्या विरोधी पक्षाशी युती केल्याचे मान्य केले. पण आमचे लक्ष्य पूर्वनियोजित होते. 370 कलमावर अजेंडा ठेवूनही आम्ही पीडीपीसोबत गेलो. ही तडजोड का केली हे आता स्पष्ट झाले आहे, असे सांगितले.
याचबरोबर त्यांनी कधी कधी दोन पावले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे टाकावे लागते असेही म्हटले आहे.