नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या उंदरांनी आम आदमी पार्टीच्या नेत्याची झोप उडविल्याचे वृत्त आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये उंदरांनी त्रस्त केले. त्यामुळे हैराण झालेल्या सोमनाथ भारती यांनी भाजपाने ही खेळी केल्याचा दावा केला आहे.
दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आलेले सोमनाथ भारती विलासपूर येथील छत्तीसगड भवनातील व्हीआयपी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी मध्यरात्री त्यांना हात-पाय कुरतडले जात असल्याची जाणीव झाली आणि त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांना गेस्ट रुमध्ये आजूबाजूला कोणी दिसले नाही. ते पुन्हा झोपी गेले. त्यानंतर पुन्हा त्यांना हाताचा चावा घेत असल्याचे जाणवले. या प्रकारामुळे सोमनाथ भारती प्रचंड हैराण झाले होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, खूप रात्र झाल्याने कार्यकर्तेही झोपी गेले होते. त्यामुळे त्यांनी कोणालाही बोलाविले नाही. अखेर त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली आणि त्यांना रुममध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर असल्याचे समजले. दरम्यान, या घटनेनंतर सोमनाथ भारती यांनी लगेचच पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलाविले आणि उंदरांना पकडण्याची मोहीमच सुरु केली. सोमनाथ भारती यांना रात्री सुमारे अर्धा डझनहून अधिक उंदरांनी चावा घेतल्याचे सांगितले जाते. तसेच, सोमनाथ भारती यांच्या औषधांचाही उंदरांनी फडशा पाडला.
सोमनाथ भारती यांनी झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना सांगितले की, भाजपा सरकारकडून ही खेळी करण्यात आली आहे. भाजपा प्रत्यक्षपणे आमचा सामना करु शकत नाही. त्यामुळे त्यांनी उंदरांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप सोमनाथ भारती यांनी केला आहे. तसेच, सोमनाथ भारती यांच्या आरोपाला भाजपाने प्रतिउत्तर दिले आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांचे असेच हाल होतात. उंदीरही त्यांना सोडत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.