नवी दिल्ली : पत्नीने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना अखेर आत्मसमर्पण करावे लागले. सोमवारी भारतींची अग्रिम जामीन याचिका धुडकावून लावत, न्यायालयाने भारतींना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. यानंतर रात्री उशीरा भारतींनी द्वारका पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले.तत्पूर्वी सकाळी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अमिताभ राय यांच्या खंडपीठाने भारतींच्यावतीने सादर माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांचा युक्तिवाद फेटाळून लावत अग्रिम जामीन देण्यास नकार दिला होता. याचिकाकर्त्याने आधी जबाबदार नागरिक या नात्याने आत्मसमर्पण करावे आणि मग दाद मागण्यासाठी आमच्याकडे यावे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यानंतर सुब्रमण्यम यांनी आपल्या अशिलास आत्मसमर्पण करण्यासाठी मंगळवार संध्याकाळपर्यंतचा वेळ मागितला. मात्र न्यायालयाने ही विनंतीही फेटाळून लावत याचिकाकर्त्याने सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजतापर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने आत्मसमर्पण केले तरच त्यांच्या जामीन याचिकेवर नव्याने १ आॅक्टोबरला सुनावणी केली जाईल, असेही न्यायालयाने बजावले. यानंतर रात्री उशीरा सोमनाथ भारतींनी पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोमनाथ भारती अखेर शरण
By admin | Published: September 28, 2015 11:49 PM