ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री व आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. बुधवारी दुपारी द्वारका न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर भारती यांना जामीन मंजूर केला आहे.
भारती यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्यावर हिंसाचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर पोलिसांनी भारती यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाण, फसवणूकीसह अनेक गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच भारती यांनी दिल्ली कनिष्ठ न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत भारतींविरोधात अटक वॉरंट काढले होते. या निर्णयाला भारती यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले होते मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला. अखेर भारती यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली आणि अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
त्यानंतर भारती यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, अखेर द्वारका न्यायालयाने आज त्यांचा जामीन मंजूर केला.