मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी कोलकात्यामध्ये निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. राजकीय विचारधारेनुसार ते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. मात्र त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांना नेहमीच सर्वांनी आदराचे स्थान दिले.
किपिंग द फेथ:मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत. आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी केली परंतु त्यांना तो परत मिळालाच नाही. पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली. रे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री ओम मेहता यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले. मात्र ओम मेहता आणि सिद्धार्थ शंकर रे यांची याबाबतीत मदत मिळाली नाही.