मुंबई- एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती वेगवेगळ्या घटनांनी, आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असावे याचे काहीच उत्तर देता येत नाही. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आयुष्य अशाच चढउतारांनी भरलेले होते. सोमनाथ हे एक कट्टर कॉम्रेड असले तरी त्यांचे वडील एन. सी. चॅटर्जी कट्टर हिंदू संस्कृतीवादी होते. हिंदू महासभेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.सोमनाथ यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी निर्मलचंद्र चॅटर्जी आणि वीणापाणी देवी यांच्यापोटी आसाममध्ये तेजपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता व इंग्लंडमध्ये झाले. इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण झाल्यावर त्यांनी हायकोर्टात वकिली सुरू केली. १९६८ साली ते सीपीएमच्या संपर्कात आले व पुढील चाळीस वर्षे ते याच पक्षात राहिले. १९७१ साली ते पहिल्यांदा निवडून गेले. ते सलग १० वेळा लोकसभेत निवडून गेले होते.
२००४ साली डाव्या पक्षांच्या मदतीने संपुआ सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांना लोकसभेचे संचालन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्याला विरोधकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र या लोकसभेच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष संपण्याआधीच चॅटर्जी यांना त्यांच्याच पक्षाने नाकारले. सलग ४० वर्षे ज्या पक्षाचे काम केले त्याच पक्षाने राजकीय कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात नाकारणे चॅटर्जी यांना मोठा धक्का देणारे होते. राजकीय निवृत्तीनंतरही ते अनेक विषयांवर आपली मते मांडत होते.भारतीय संसदेच्या इतिहासात त्यांचे नाव एक आदर्श संसदपटू म्हणून नेहमीच घेतले जाईल यात शंका नाही. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निमित्ताने लोकसभेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच डाव्या पक्षाच्या सदस्यांना संधी मिळाली होती. तत्पूर्वी काँग्रेस, जनता पक्ष सारख्या राष्ट्रीय पक्षांच्या सदस्यांना या पदाची संधी मिळाली होती, तेलगू देसम, शिवसेना यांचेही सदस्य सभापती झाले होते. मात्र चॅटर्जी यांच्या रूपाने प्रथमच डाव्या पक्षाचे खासदार या पदावर बसत होते. भारतीय लोकशाहीच्या सर्वसमावेशकतेचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल.