मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले. पश्चिम बंगालमधील एक उत्तम नेता आणि तितकेच प्रभावी संसदपटू असणा-या सोमनाथबाबूंच्या कार्यकाळातील आठवणी भारतीयांच्या मनात सदैव राहतील. लोकसभेत त्यांची भाषणे आणि सभापतीपदी असताना त्यांनी केलेले काम संसदेच्या इतिहासातील शाश्वत पाने म्हणून ओळखली जातील. लोकसभेत सोमनाथ चॅटर्जी डाव्या पक्षाचे तर सुषमा स्वराज या भारतीय जनता पक्षाच्या असल्या तरी या दोघांमध्ये बहीण-भावासारखे नाते दिसून येई. त्याबद्दल लोकसभेत अनेकदा दोन्ही नेत्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. भारत हा कसा एकात्म आहे, संपूर्ण भारतातील प्रांतांचे आहार, नृत्य, तीर्थक्षेत्रे कसे भारतीय आहेत हे सांगताना सुषमा स्वराज यांनी थेट सोमनाथबाबूंचे उदाहरण सांगितले. भारतीय लोक सर्व प्रांताना आपले मानत नसते तर कोलकात्यात जन्मलेले एन. सी. चॅटर्जी यांनी आपल्या मुलाचे नाव सोमनाथ ठेवले नसते.(सोमनाथ तीर्थक्षेत्र गुजरातमध्ये आहे).सुषमा स्वराज यांच्या या विधानामुळे संपूर्ण लोकसभा हास्यकल्लोळात बुडून गेली. खुद्द सोमनाथ चॅटर्जी यांनाही हसू आवरले नव्हते तर भाजपाच्या आघाडीच्या नेत्या राजमाता विजयाराजे सिंदिया यांनी स्वराज यांची पाठ थोपटली होती. असे हास्यविनोद स्वराज आणि चॅटर्जी यांच्या भाषणात असल्यामुळे लोकसभेत तणाव निवळण्यास मदत येई. या जोडीतील एखाद्या आरोपाबद्दल दुस-या नेत्यास स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास भाषण थांबवून हे दोन्ही नेते खाली बसत. चॅटर्जी यांच्या निवृत्तीनंतर हे चित्र पुन्हा दिसले नाही.सभापती असताना चॅटर्जी यांनी एके दिवशी अचानक बंगालीमध्ये बोलायला सुरुवात केली. या अचानक बंगाली निवेदनाचा कोणालाही काहीच बोध झाला नाही. शेवटी आज मातृभाषा दिन आहे, असे सांगत चॅटर्जी यांनी खुलासा केला. त्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मातृभाषेत भाषणे करून चॅटर्जी यांना धन्यवाद दिले.
Somnath Chatterjee death updates: दोन ध्रुवांवरची सोमनाथ- स्वराज जोडी लोकसभेला हसवायची तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 10:33 AM