राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका दहा वर्षांच्या मुलाचा त्याच्या आई-वडिलांसमोरच आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आई-वडिलांसमोर मुलगा जळत होता पण ते काहीच करू शकले नाही. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील घंटाली पोलीस स्टेशन क्षेत्रातील बनघाटी गावात ही भीषण घटना घडली. रविवारी दिवाळीत एका घराला आग लागली. या आगीत आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर दहा वर्षांचा मुलगा जळाला. या दाम्पत्याने आपल्या मुलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. ते स्वतः देखील आगीत होरपळून निघाले. या अपघातात त्यांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. तर एक मुलगीही भाजली. दाम्पत्याला आणि मुलीला प्रतापगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकरणाचे तपास अधिकारी सोहनलाल यांनी सांगितलं की, सीताराम मीणा यांचे बनघाटी गावात रेशनचे दुकान आहे. हे दुकान त्यांच्या घरातच आहे. रविवारी सकाळी त्यांच्या घराला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. यावेळी सीताराम व त्यांची पत्नी दुकानात तर त्यांचा मुलगा राहुल घरातच होता. आग इतकी वेगाने पसरली की त्यांचा मुलगा बाहेर येऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
गावातील भगवान मीणा यांची दुकानात सामान घेण्यासाठी आलेली आठ वर्षांची मुलगी भूलकी आणि राहुलचे आई-वडीलही भाजले. ही बाब ग्रामस्थांना समजताच त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. लाखो प्रयत्न करूनही दाम्पत्य आणि गावकरी राहुलला वाचवू शकले नाहीत. राहुलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.