लखनऊ - तुम्ही फेव्हिक्विकची जाहिरात तर पाहिली असेलच. 'चुटकी मे चिपकाए' असा दावा फेव्हिक्विकच्या जाहिरातीतून केला जात असतो. अनेकजण जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवत जे काही सांगितलं जात ते खरं असल्याचं मानतात. पण आपण कोणत्या गोष्टीसाठी ती वस्तू वापरत आहोत याचंही भान असावं लागतं. उत्तर प्रदेशात अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका आरोपी मुलाने वडिलांचा गळा कापल्यानंतर फेव्हिक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न केला. यातना होत असल्याने जोरजोरात ओरडणा-या आपल्या वडिलांचा आवाज शेजा-यांना ऐकू जाऊ नये म्हणून आरोपी मुलाने टीव्हीचा आवाज वाढवला होता. गळा चिकटत नसल्याचं पाहून तो घाबरला आणि वडिलांना त्याच अवस्थेत सोडून पळ काढला.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोनहा पोलीस स्टेशनअंतर्गत येणा-या परिसरात रामदेव मिश्र यांचं घर आहे. रामदेव रेल्वेत काम करत होते. रिटायर्ड झाल्यानंतर ते घरीच होते. त्यांच्या पत्नीचं निधन झालं असून, ते आपला मुलगा जगदीश, सून आणि दोन नातवंडांसोबत राहत होते.
शनिवारी रामदेव आपल्या घरातील खोलीत झोपले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा जगदीश अचानक आला आणि त्यांच्या गळ्यावर चाकू फिरवला. जगदीश सोबत फेव्हिक्विक घेऊन आला होता. वडिलांचा गळा कापल्यानंतर त्याने फेव्हिक्विकने तो जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामदेव यांना यातना होऊ लागल्याने ते ओरडू लागले. पण निर्दयी मुलाने टीव्हीचा आवाज वाढवला, ज्यामुळे त्यांचा आवाज कोणाला ऐकू जाऊ नये.
बराच वेळ फेव्हिक्विकने जगदीश वडिलांचा गळा चिकटवण्याचा प्रयत्न करत राहिला. पण जेव्हा असं होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं ते व्हा मात्र वडिलांना त्याच अवस्थेत सोडून त्याने पळ काढला. जाताना त्याने बाहेरुन रुम लॉक केला.
रामदेव यांचा आवाज ऐकल्यानंतर शेजा-यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली. घरात गेले असता रामदेव रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. लोकांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जगदीश सध्या बेरोजगार आहे. 2005 मध्ये त्याने आपल्या पत्नीला छतावरुन ढकलून हत्या केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. दुस-या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत'. आरोपी मुलगा जगदीश सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेतली आहे.