कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. प्रज्वल समृत (Prajwal Samrit)असं त्याचं आहे. प्रज्वलच्या जन्माच्या अवघ्या ४५ दिवस आधी, त्यांचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा होता. त्यानं लष्करात अधिकारी म्हणून जावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता आपल्या वडिलांची ही इच्छा त्यांचा छोटा मुलगा पूर्ण करणार आहे.
प्रज्वल जूनच्या पहिल्या आठवड्यात डेहराडूनमधील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये (IMA) कॅडेट म्हणून रुजू होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. त्याचा मोठा भाऊ कुणाल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, प्रज्वलनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नऊ वेळा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखतीला सामोरे गेलेल्या प्रज्वलसाठी हे बिलकुल सोपं नव्हतं.
बारावीनंतर ड्रॉप घेतला
“आम्हाला योग्य तारीख माहित नाही. पण आम्ही ३० जुलैला त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. २०१८ मध्ये मी एनडीएच्या प्रवेशासाठी बारावीनंतर ड्रॉप घेतला होता आणि पहिली एसएसबी उत्तीर्ण केली होती. परंतु मेडिकल परीक्षेत अपयश आलं. त्यानंतर पुण्याला जाऊन बीएससीसाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मी एसएसबीच्या सात आणखी मुलाखती दिल्या. प्रत्येक वेळी स्क्रिनिंगमधून पुझे गेलो आणि कॉन्फ्रेंटमघ्ये बाहेर गेलो,” असं प्रज्वलनं सांगितलं.
आठव्यांदाही आपण अपयशी ठरलो आणि जवळपास पराभवच स्वीकारला. परंतु आपला शेजारी नितीन यानं अखेरच्या संधीपर्यंत प्रयत्न करण्यास सांगितलं. प्रज्वलनं आठव्यांदा अपयश आल्यानंतर जवळपास पराभव स्वीकारला होता. परंतु मी त्याला विश्वास ठेवण्यास सांगितलं. त्यानं आपल्या जीवनातील सर्वच परीक्षांमध्ये टॉप केलं. त्यानं सर्वकाही आपल्याच हिंमतीवर मिळवल्याचं नितीन यांनी सांगितलं.
अखेरची संधी
“ही माझ्यासाठी अखेरची संधी असल्यामुळे मला एक मजबूत बॅकअप प्लॅन तयार करावा लागला. मी कॉमन ॲडमिशन टेस्ट क्रॅक केली आणि या महिन्यात आयआयएम इंदूर आणि कोझिकोडमधून ऑफर मिळाली,” असं प्रज्वलनं आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं. “जरी कारगिल युद्धात आपल्याला आपल्या पतीला गमवावं लागलं असलं तरी आपला एक मुलगा त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असा निश्चय केला होता,” असं प्रज्वलची आई सविता यांनी म्हटलं.
अभिमान वाटतो
“माझ्या मोठ्या मुलानं लष्करातील अधिकारी व्हावं असं माझ्या पतीची इच्छा होती. परंतु मोठा मुलगा कुणालला ते शक्य झालं नाही. परंतु प्रज्वल हे करू शकतो अशी आम्हाला अपेक्षा होती. आज आम्हाला अतिशय अभिमान वाटतो,” असं त्या म्हणाल्या. प्रज्वलची आई सविता या पुलगांवमधी आर्मी हॉस्पीटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १९९१ मध्ये कृष्णाजी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. कारगिलमध्ये जाण्यापूर्वी हे दांपत्य त्रिवेंद्रम, बेळगाव आणि कोलकात्यात वास्तव्यास होतं. परंतु आता त्या पुलगाममध्येच वास्तव्यास आहेत.