अहमदाबाद - मेहुण्याच्या लग्नाला आला नाही म्हणून जावयाला सासरच्यांनीच मारहाण केल्याची अजब घटना समोर आली आहे. मारहाण करण्यात आलेले 34 वर्षीय पिनाकिन सोलंकी बँकेत एक प्रतिष्ठीत अधिकारी म्हणून काम करतो. आपल्या पत्नीसोबत लग्नाला पोहोचू शकला नाही या क्षुल्लक कारणावरुन पत्नीच्या कुटुंबियांनी त्याला जबरदस्त मारहाण केली. याप्रकरणी यांनी पत्नी आणि सारच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पिनाकिन सोलंकीच्या मेहुण्याचं 5 जानेवारीला लग्न होतं. नेमकं त्याच दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये प्री-प्रमोशन ट्रेनिंगदेखील ठेवण्यात आली होती. यामुळेच तो आपली पत्नी निकितासोबत अहमदाबादला लग्नाला पोहोचू शकला नाही.
10 फेब्रुवारीला पिनाकिन सोलंकी आपली आई शारदाबेन यांच्यासोबत आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेले होते. पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पिनाकिन सोलंकी यांना दरवाजातच सासरच्यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली होती.
यानंतर पिनाकिन सोलंकी यांना त्यांची पत्नी, सासरा, मेहुणा आणि मेहुणीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या आई शारदाबेन यांनाही मारहाण करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाणीनंतर पिनाकिन सोलंकी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांच्या आईवर प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आलं. 'आम्ही पिनाकिन सोलंकीच्या पत्नी आणि सासरच्यांविरोधात मारहाण आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे', अशी माहिती पोलीस निरीक्षक अंकुर पटेल यांनी दिली आहे.