मुंबई- अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे ट्वीट करुन आपल्या आजाराबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार त्याच्या स्वरुपावरुन, तो पसरण्याच्या वेगावरुन ठरत असतात. त्यातीलच 'हाय ग्रेड' हा एक प्रकार आहे. मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची 'ग्रेड' ठरवली जाते.
'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये कर्करोगाच्या पेशी 'लो ग्रेड' कर्करोगापेक्षा वेगाने वाढतात आणि वेगाने पसरतात. कर्करोगाचे असे ग्रेडस केल्यामुळे त्या रोगाचे पुढील चढउतार व संभाव्या उपचार यांचा विचार डॉक्टरांना करणे सोपे जाते. 'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये उपचार पद्धती आणि उपचार 'लो ग्रेड'पेक्षा अधिक तीव्रतेचे व वेगाने करावे लागतात.
ग्रेडसनुसार कर्करोग कोणत्या वेगाने वाढत आहे हे समजून येते.
- ग्रेड 1- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसतात व वेगाने वाढत नसतात.
- ग्रेड 2- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसत नसतात व सामान्य पेशींपेक्षा वेगाने वाढत असतात.
- ग्रेड 3- यामध्ये कर्करोगाच्या पेशी असामान्य दिसतात आणि अत्यंत वेगाने आक्रमक पद्धतीने वाढत असतात.
सोनाली बेंद्रेने आपली कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.