पणजी: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटचा मंगळवारी गोव्यात मृत्यू झाला. पण, आता त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण, सोनाली पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात करतील.
कुटुंबीयांनी दाखल केला हत्येचा गुन्हागोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. मात्र, पोस्टमॉर्टमनंतरच संपूर्ण प्रकार समोर येईल. बुधवारी त्यांचे शवविच्छेदन होणार होते, मात्र कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्याने ते होऊ शकले नाही. मात्र, आता सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी पोलिसात कलम 302 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस अद्याप शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अहवाल आल्यानंतरच पोलिस तपासाला पुढे जातील.
काय आहे संपूर्ण प्रकरण?सोनाली फोगट ही टिकटॉक स्टार होती, 2019 मध्ये ती प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तेव्हाच भाजपने तिला हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत सोनालीचा काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांनी पराभव केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आली होती.
ती अंजुना येथील एका हॉटेलमध्ये थांबली आणि सोमवारी रात्री ती एका पार्टीला गेली होती. दुसऱ्या दिवशी अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर सकाळी तिला सेंट अँथनी रुग्णालयात आणण्यात आले. पण, रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. फार्म हाऊसमधून सीसीटीव्ही कॅमेरा आणि लॅपटॉप गायब असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. तिच्या दोन साथीदारांनी तिची हत्या केल्याचा दावाही करण्यात आला आहे.