तुम्ही आमीर खानचा थ्री इडियट्स पाहिला असेल. त्यात एक रँचो नावाचे पात्र होते. तोच खराखुरा रँचो सिनेमानंतर जगासमोर आला होता. आज याच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी सिनेरसिकांनाच नव्हे तर समस्त देशभक्तांना गर्व वाटेल असे काम केले आहे. लडाखमध्ये जीवन जगत असताना त्यांनी भारतीय सैन्याला एवढी महत्वाची मदत केलीय की आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) देखील त्यांना सलाम केला आहे.
सोनम वांगचुक यांनी असा टेंट बनविला आहे की, तो गलवानच्या खोऱ्यात कठीण परिस्थितीत देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना थंडीपासून संरक्षण देतो. सूर्यापासून मिळणारी उष्णता हा टेंट साठवितो आणि रात्री तापमान १४ अंशांपेक्षा खाली आले की तीच उष्णता जवानांना देतो. महत्वाची बाब म्हणजे हा पोर्टेबल आहे आणि भारतीय सैन्य सध्या जे टेंट वापरतात त्यापेक्षा त्याची किंमत निम्म्याने कमी.
शून्यापेक्षाही कमी तापमानात हा टेंट आतील वातावरण १५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ठेवतो. वांगचुक यांनी यासाठी फार काही वापरलेले नाही. त्यांनी यासाठी फक्त सामान्य विज्ञानाचा वापर केला आहे. हा टेंट सूर्याची किरणे पडली की त्यातील उष्णता शोषून घेतो. ही उष्णता शोषून घेण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. टेंटचे इन्सुलेशन ही उष्णता रात्रीसाठी राखून ठेवते. यामुळे बाहेरील तापमान कितीही घसरले तरी आतील तापमान उबदार राहते. या टेंटचे वजन ३० किलो आहे, तसेच हा काही भागात विभागता देखील येतो. याचा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी देखील शेअर केला आहे. तुम्हीही एकदा पहाच.