सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 08:37 AM2024-10-01T08:37:12+5:302024-10-01T08:40:24+5:30
Delhi Police : लडाखहून दिल्लीत आंदोलन करण्यासाठी आलेल्या सोनम वांगचुक यांना सिंघू सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेतले.
Rahul Gandhi on Detains Sonam Wangchuk : दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांच्यासोबत जवळपास १३० लोक आंदोलनासाठी दिल्लीत येत होते. मात्र सोनम वांगचुक हरियाणातून दिल्लीत दाखल होताच दिल्ली पोलिसांनी सर्वांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी सोनम यांच्यासह सर्वांना ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार मोडला जाईल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
लडाखमध्ये काही दिवसांपूर्वी उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह लडाखमधील १३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनम वांगचुक हे त्यांच्या ७०० किलोमीटर लांब 'दिल्ली चलो पदयात्रे' दरम्यान हरियाणातून दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी त्याना रोखले. त्ंयाच्यासोबत लडाखमधील सुमारे १३० नागरिकही आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने येत होते. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक्स पोस्टमधून राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला आहे.
"पर्यावरण आणि घटनात्मक हक्कांसाठी शांततेने मोर्चे काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाखमधील लोकांना ताब्यात घेणे अस्वीकार्य आहे. लडाखच्या भवितव्यासाठी उभ्या असलेल्या या लोकांना दिल्ली सीमेवर का अडवले जात आहे? मोदीजी, शेतकऱ्यांप्रमाणेच हे चक्रव्यूहही मोडेल जाईल आणि तुमचा अहंकारही मोडेल. तुम्हाला लडाखमधील लोकांचा आवाज ऐकावा लागेल," असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिल्लीतील अनेक भागात बीएनएस कलम १६३ लागू केले आहे. त्यानुसार ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास, आंदोलन करण्यास बंदी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी केला होता. त्यांनी प्रशासनावर आरोप केला की पोलीस त्यांचा शांततापूर्ण मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली सीमेवर हजारो पोलिसांचा फौजफाटा जमा झाला आहे. मला ताब्यात घेतल्यानंतर कुठे नेले जाईल याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचेही सोनम वांगचुक म्हणाले.
सोनम वांगचुक आंदोलन का करत आहेत?
सोनम वांगचुक १ सप्टेंबर रोजी सुमारे १३० लोकांसह लडाखहून दिल्लीसाठी निघाले होते. ते हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, मनाली, कुल्लू, मंडी, चंदीगड मार्गे दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सातत्याने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी आणि लडाखसाठी लोकसेवा आयोग असावा अशीही त्यांची मागणी आहे. लडाख आणि कारगिलसाठी लोकसभेच्या स्वतंत्र जागा देण्याचीही त्यांची मागणी आहे.