'थ्री इडियट्स'मध्ये आमिर खानने प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुकची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात आमिर खानचे 'रॅन्चो' असे होते. खऱ्या अर्थान सोनम वांगचुकची या चित्रपटामुळेच सर्वसमान्यांमध्ये ओळख झाली होती. आता सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी थेट सध्या भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या सीमा वादावरच आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी चीनशी झालेल्या तणावातून चीनला प्रत्युत्तर देण्याविषयी व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओ यूट्यूब पेजवर शेअर केला आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत यांनी व्यक्त केलं आहे.
एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे, असं मत वांगचुक यांनी व्यक्त केलं आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे वांगचुक यांनी लेह-लडाखमधील एका निर्जन ठिकाणी बसून विस्तृत विश्लेषण केलं आहे.
सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे की, जर आपण चीनी वस्तू खरेदी करणे थांबवले तर चीनचा आर्थिक कणा मोडेल.करोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडत आहे. चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात पडला आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे. त्याचा फायदा आता इतर देशांनी घेणे गरजेचे आहे.